चिंतामणरावांनी जसे शरीरात रक्ताचे अभिसरण होते तसे समाजात ज्ञानाचे अभिसरण ही संस्था करते त्यामुळे संस्थेचे नाव ग्रंथाभिसरण असायला हवे असे सुचविले आणि त्यांच्या ह्या सूचनेचा मान ठेवून सर्क्युलेशन लायब्ररीचे ग्रंथाभिसरण मंडळ असे नामांतर केले. तेव्हापासून आजतागायत ही संस्था ग्रंथाभिसरण मंडळ या नावाने ओळखली जाते. सन १९५८ मध्ये मुंबई सार्वजनिक न्यास कायदा १९५० नुसार संस्था नोंदणीकृत झाली.
संस्थेच्या ग्रंथालयात विविध प्रकारच्या साहित्याची भर पडत होती. मासिके, साप्ताहिके, दैनिके यात वाढ झाली. संस्थेच्या मुक्तव्दार वाचनालयाचा लाभ सर्वसाधारण नागरिकांना मिळाला.
अंबरनाथ येथील सूर्योदय को.आप.हौसिंग सोसायटीने संस्थेला प्लॉट क्र.५३ / अ उपलब्ध करून दिल्यानंतर सन १९९६ मध्ये मे.साईधाम कन्स्ट्रक्शनने विकास तत्त्वावर संस्थेला दुमजली इमारत बांधून दिली. अशा रितीने संस्थेला स्वतःच्या मालकीची वास्तु प्राप्त झाली व या ठिकाणी संस्थेचा कारभार अधिक जोमाने सुरू झाला. संस्थेला यशवंतराव प्रभाकर भुवनमध्ये जी भाडेतत्त्वावर जागा मिळाली होती त्या जागेचा विकास करताना मे. जीवनदीप बिल्डर्स यांनी मालकी तत्त्वावर वास्तु देण्याचे मान्य केले. आज ग्रंथाभिसरण मंडळाचे यशवंतराव प्रभाकर भुवनामधील हे सुविधा केंद्र वाचकांच्या सोयीसाठी उत्तमरित्या सुरू आहे. वाचकांना दोन्ही ठिकाणांहून ग्रंथ देवघेवीची सुविधा उपलब्ध आहे.
संस्थेच्या ग्रंथालयात सुमारे ४०,००० चे वर ग्रंथ असून ७५ प्रकारची मासिके, ११ पाक्षिके व साप्ताहिके, १० बाल मासिके येतात. सभासदांना वाचनास घरी नेता येतात. संस्थेच्या सभागृहात सर्व नागरिकांसाठी निःशुल्क वाचन कक्ष ( वर्तमानपत्र व साप्ताहिके ) असून त्यात १८ वर्तमानपत्रे नियमित उपलब्ध आहेत.
संस्थेत उपलब्ध असलेले कोश, दुर्मिळ ग्रंथ इ.संस्थेतच विनामुल्य वाचनास उपलब्ध आहेत.
या सुविधेचा गरजू व होतकरू असलेले ७० विद्यार्थी लाभ घेत आहेत.
संस्थेच्या कार्यकारी मंडळात प्रामाणिक,नि:स्वार्थी व सामाजिक बांधिलकीची जाण असलेले सुविद्य कार्यकर्ते
आहेत.
संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा कार्यक्षम व तत्पर सेवा देणारा विनम्र कर्मचारी वर्ग म्हणून उल्लेख केला जातो. दरवर्षी संस्थेतर्फे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. येथील स्थानिक साप्ताहिक आहुती व दैनिक अंबरनाथ टाईम्स यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला तर सन १९९८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार ( तालुका ब या वर्गासाठी ) प्राप्त करून संस्थेने प्रगती पथावर वाटचालीत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
आपल्या ग्रंथालयाला त्याच वर्षी ‘तालुका अ’ दर्जा प्राप्त झाला आणि आज ग्रंथालय ‘तालुका अ’ वर्गाच्या पुरस्कारासाठी प्रतिक्षा यादीत आहे. ग्रंथालयाच्या दोन कर्मचाऱ्यांस ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ, ठाणे तर्फे आदर्श ग्रंथपाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संस्थेच्या स्थापनेपासून ते आजमितीपर्यंत अनेक नामवंत साहित्यिक, समाजसेवक इ.मान्यवरांनी संस्थेला भेट देऊन संस्थेच्या ज्ञानप्रसाराच्या कार्याची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले आहे. आजवर शिवशाहिर पुरंदरे, श्री.ना.पेंडसे, का.न.केळकर, अनंत काणेकर, चिं.वि.जोग, वा.य.गाडगीळ, गो.नी.दांडेकर, द.मा.मिरासदार, ग.वा.बेहेरे, अरूण साधू, जयवंत दळवी, बाबा कदम, वसंत वराडपांडे, प्रभाकर अत्रे, शांता शेळके, गिरीजा कीर, शैलजा राजे, ज्योत्स्ना देवधर, चारूशीला गुप्ते, शं.ना.नवरे, पु.शि.रेगे, मंगेश पाडगावकर, वि.आ.बुवा, राजा राजवाडे, शिवाजी सावंत, अनंत यादव,माधव गडकरी, लक्ष्मण लोंढे, रविंद्र पिंगे, अनंत अंतरकर, चिं.(शेजवलकर), ना.वि.आठवले, जगदीश गोडबोले, जगदीश कबरे, रमेश मंत्री, कर्नल श्याम चव्हाण, डॉ.कला आचार्य, अनंत भावे, खासदार राम कापसे, आमदार साबिर भाई शेख, प्रकाश परांजपे डॉ.महेश केळुसकर, सुहास काणे, अरूण हरकारे, अंजली कीर्तने, रवी पटवर्धन, दुर्गेश परूळकर, कर्नल श्रीराम पेंढारकर, माधवी घारपुरे, चंद्रशेखर वझे, श्री. चंद्रशेखर टिळक इ. नामवंतांनी ग्रंथालयास भेट दिली.
रसिक ग्रंथप्रेमीआमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी ग्रंथालयास दोन वेळा आमदार निधीतून ग्रंथ व संगणकीय साहित्य उपलब्ध करुन दिले.
संस्थेच्या विकास व प्रगतीच्या जडणघडणीमध्ये स्थापनेपासून ते आजपर्यंत कार्यकारी मंडळातील सभासद व सर्वसाधारण सभासद यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे हे ऋण कधीही न फिटणारे आहे. यामुळेच संस्थेला या वर्षात अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याचे अभूतपुर्व भाग्य लाभले आहे.